Tuesday, December 15, 2020

Radhe Radhe



प्रसन्न एका सकाळी,

कृष्ण समवेत अष्टपत्नी,

रमले होते हास्यविनोदात सकळी...


दुग्ध प्राशन करण्या घेतला प्याला,

चटका कृष्णाच्या बोटाला बसला,

कृष्णमुखातून एकचं बोल आला "राधा-राधा"!!..


सार्या राण्यांनी प्रश्न एकचं केला,

स्वामी, का सदैव आपल्या मुखी, राधा?

काय असे त्या राधेत, जे नाही आमच्यात?...


काहीच न बोलला तो मेघश्याम,

मुखावर विलासत केवळ आर्त भाव,

जणू गेला गढून राधेच्या आठवणीत...

.

.

.

काळ काही लोटला...

कृष्ण देवेंद्राच्या भेटीस निघाला,

निरोप देण्या प्रिया सार्या जमल्या,

कृष्णाने पुसले,

 "काय प्रिय करु तुम्हाला?"


सत्यभामेची इच्छा एक,

 दारी असावा तो स्वर्गीय पारिजात,

सातजणींनी मागणे काही मागीतले,

कृष्णाने रुक्मिणीस पुसले, 

"सांग, तुझे काय मागणे?"


चरणस्पर्श करण्या रुक्मिणी झुकली,

कृष्णाची मऊसूत पाऊले पाहून थबकली, 

नकळत वदली,

"स्वामी, इतके अवघड जीवन, 

तरी पाऊले आपली कशी इतकी कोमल?"


कृष्ण केवळ हसला, 

अन् "राधा राधा" वदला,

रुक्मीणीने मग हट्टच धरला,

 "प्रत्येक वेळी का राधा राधा?"

या प्रश्नाचे उत्तर, 

हेच प्रिय माझे आता ...


सांगाच आम्हास आज,

कृष्णाच्या मुखी का "राधा राधा?"

हे कृष्णा, 

निद्रेत तुझा श्वासही बोलतो राधा राधा!

का असे इतकी प्रिय ती राधा?


कृष्ण वदला, 

"हाच प्रश्न मी राधेला ही होता पुसला,

सोडून वृंदावन जेव्हा निरोप तीयेचा घेतला.

पुन्हा न भेटणे या जगती आता,

 हे ठावे होते तिजला".


"ह्ळूचं धरून हनुवटीला, 

पुसले राधेला,

सांग राधे, 

आयुष्याची काय भेट देऊ तुजला?

मी सोडून, काहीही माग तू मजला".


"कान्हा, 

ऐक, दिलेस तू वचन मजला,

नाही बदलणे आता शब्द तुजला,

जे मागीन मी, ते द्यायचेच तुजला"...


"कान्हा, 

वर एकचं असा दे तू मजला"...


"पाऊल प्रत्येक तुझे,

 माझ्या हृदयीच्या पायघड्यांवर पडू दे,

सल इवलासा जरी सलला तुझ्या अंतरी वा शरीरी,

तर क्षत त्याचा उमटू दे रे माझ्या शरीरी"...

.

.

.

"राधे, राधे, काय मागीतलेस हे?

आयुष्याचे दुःख माझे,

का पदरात घेतलेस हे?

सारे म्हणती, राधा चतुर शहाणी,

का आज अशी ही वेडी मागणी"?


गोड हसून, हृदय राधेचे बोलले,

"कान्हा, नाहीचं कळणार तुला माझी चतुराई.

तुझ्या पासून वेगळे आस्तीत्व आता राधेला नाही".


"कान्हा, 

तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल, 

हृदय माझे मजला देईल.

अन् शरीरी उमटता क्षत प्रत्येक, 

क्षेम तुझे मला कळवेल".


"कृष्ण आणि राधा, 

नाही आता वेगळे,

दोन तन जरी,

 तरी एकजोड आत्मे",


सारेच होते स्तब्ध, ऐकत,

अश्रूधारा कृष्णाच्याही डोळ्यातं,

तनमनात केवळ,

 नाम राधेचे होते घुमतं.


"प्रियांनो,

पाऊल प्रत्येक माझे, 

हृदय राधेचे तोलते,

घाव सारेच माझे राधा सोसते,

म्हणून चरण माझे राहिले कोमल ते"...


"प्रत्येक पाऊल ठेवता, 

हृदय राधेचे दिसते,

सल तनमनात उठता वेदना राधेची जाणवते,

अन् म्हणून प्रत्येक श्वासात राधा वसते"...


"प्रियांनो,

प्रेम तुम्ही केले,

प्रेम मी ही केले,

पण 

राधेच्या प्रेमाची जातचं वेगळी...

ती एकच एकमेव राधा आगळी...


जोवरी राहील मानवजात,

तोवरी राधा म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव...

राधा म्हणजे केवळ प्रेमभाव...

राधा म्हणजे प्रेमाचा एक गाव...

प्रत्येकाच्या अंतरीचा कोवळा भाव...

मला ही वंदनीय माझी राधा...

कृष्णाच्याही आधी बोला "राधा राधा"...


राधा-राधा....

राधा-राधा....


author Digital Shende, Satara

No comments:

Post a Comment